नवी दिल्ली -उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांचे पार्थिव झाकण्यात आलेल्या राष्ट्रध्वजावर भाजपाचा झेंडा टाकण्यात आला होता. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी रविवारी एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये कल्याण सिंह यांचा मृतदेह हा राष्ट्रध्वजाने झाकलेला दिसतो. पण त्यातील अर्धा भाग भाजपा पक्षाच्या ध्वजाने झाकलेला दिसत आहे. न्यू इंडियात राष्ट्रीय ध्वजावर पक्षाचा झेंडा लावणे ठीक आहे का, असा सवाल श्रीनिवास बी. व्ही यांनी भाजपाला केला आहे. त्याच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर्स भाजपाविरोधात रोष व्यक्त करत आहेत.
'भारत राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही', असे ट्विट युवक काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीही फोटो ट्विट करत भाजपावर टीका केली. 'देशापेक्षा पक्ष मोठा. तिरंग्याच्यावर झेंडा. याचा भाजपाला नेहमीप्रमाणे: ना खेद, ना पश्चाताप, ना दु: ख, ना शोक, असे त्यांनी म्हटलं.