नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गाझियाबादमध्ये एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण आणि दाढी कापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी तीच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये स्वारासह इतर काही लोकांचीही नावे आहेत. यात ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी यांचेही नाव आहे. दाखल केलेल्या तक्रारीतील आरोपाबाबत सध्या चौकशी सुरू आहे. तक्रारीचा तपास केल्यानंतर एफआयआर होतो की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे डीसीपी दीपक यादव यांनी सांगितले.
अभिनेत्री स्वरा भास्करवर मारहाणीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून घटनेला जातीय रंग दिल्याचा आरोप आहे. तर ट्विटरने व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखलं नाही, असा आरोप तक्रारीत आहे.
काय प्रकरण?
गाझीयाबादमधील व्हायरल व्हिडिओत काही तरुण वृद्ध मुस्लिम व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देण्याची बळजबरी हल्लेखोरांनी आपल्यावर केली. मोबाइल काढून घेतला आणि चाकूने आपली दाढी कापली, असे पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी हे बुलंदशहरातील रहिवासी आहेत. गेल्या 5 जूनला ते लोनी बॉर्डरच्या बेहटा येथे पोहचले. अब्दुल समद तेथून एका अन्य व्यक्तिसोबत आरोपी प्रवेश गुज्जरच्या घर बंथला गेले होते. पीडित अब्दुल समद ताबीज बनवण्याचे काम करतात. त्यांचे ताबिजचा प्रभाव उलटा झाल्यानंतर आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पीडित व्यक्तीने आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केल्याचा आरोप केला.