नवी दिल्ली- पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅसे सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर सुमारे १०० रुपयांनी वाढविले आहेत. नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा सण असताना पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर वाढविले आहेत. या दरवाढीची झळ हॉटेल व्यावसायिकांसह ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.
दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचे बदलले दर आजपासून लागू होणार आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेश लि. कंपनीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर आजपासून १,८३३ रुपये असणार आहे. यापूर्वी हा सिलिंडर १,७३१ रुपये दर होता. मुंबईत गॅस सिलिंडरचा दर १,६८४ रुपयावरून १,७८५.५० वर पोहोचला. कोलकात्यात गॅस सिलिंडरचा दर हा १८३९.५० वरून १,९४३ वर पोहोचला. तर चेन्नईत गॅस सिलिंडरचा आजपासून १९९९.५० रुपये होणार आहे. यापूर्वी चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर हा १,८९८ रुपये होता.
जागतिक बाजारपेठेतील दराप्रमाणं बदलतात दर-गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं उज्जला योजनेतून देण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली होती. उज्जवला योजनेतील लाभार्थी महिलांना सवलत मिळण्यासाठी हा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यातदेखील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले होते. ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांहून अधिक वाढले होते. जागतिक बाजारपेठेतील दराप्रमाणे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे दर बदलण्यात येतात. सप्टेंबर महिन्यात डिझेलच्या विक्रीत घसरण झाली होती. सर्वसाधारणपणे मान्सूनच्या काळात डिझेलच्या विक्रीत घसरण होते. कारण मान्सूनमध्ये कृषी क्षेत्रामधून डिझेलची मागणी कमी असते.