नई दिल्ली : सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मंगळवारी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 7 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. साधारणत: महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती या स्थिर आहेत.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत : मिळालेल्या माहितीनुसार, आता दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली आहे. संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले तर मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत 1,732 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी प्रति सिलेंडरची किंमत 1,725 रुपये होती. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये जुनी किंमत 1,937 रुपये होती, ती आता 1,944 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत 1,882.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.