विल्लुपुरम (तामिळनाडू) :पैशांची चणचण भासणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाने आपल्या मैत्रिणीला महागडे व्हॅलेंटाइन गिफ्ट देण्यासाठी बकरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही चोरी करताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा तरुण ती चोरलेली बकरी विकून त्या पैशातून आपल्या मैत्रीणीला व्हॅलेंटाईन गिफ्ट देणार होता. या चोरीत त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली आहे. जगभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडप्यांनी भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्या मैत्रिणीला खूश करण्याच्या प्रयत्नात त्याने हे कृत्य केले.
शेजाऱ्यांनी पकडून दिले : विल्लुपुरम पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही विल्लुपुरम जिल्ह्यातील पीरंगिमेडू मलयारासन कुप्पा येथील रहिवासी आहे. ती तिच्या घरामागील शेडमध्ये शेळ्या पाळते. त्या दिवशी दोन तरुण तिच्या घराजवळ आले आणि त्यांनी तिचा बकरा हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. बकऱ्या ओरडण्याचा आवाज ऐकून महिला बाहेर आली आणि तिने आरडाओरडा चालू केला. आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तरुणाला घेरले. त्यानंतर त्यांनी तरुणांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरी करणारा तरुण एका तरुणीच्या प्रेमात आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्यासाठी भेटवस्तू घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याने एक बकरी चोरून ती विकून भेटवस्तू खरेदी करण्याचा बेत आखला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अलीकडे या आजूबाजूच्या परिसरात बकऱ्या चोरीच्या घटना वाढत असून, या घटनांमध्ये देखील अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांचा हात आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.