मुंबई -राज्याच्या काही भागात गारवा कमी झाला असला तरी दोन दिवसांनंतर तापमानात घट होऊन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातही जानेवारी महिन्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट होती. संपूर्ण राज्याच्या किमान तापमानाचा पारा मोठय़ा प्रमाणावर घसरल्याने हुडहुडी भरली होती.
सध्या उत्तरेकडील थंडीची लाट ओसरली आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत थंडीचा कडाका कायम आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र किमान तापमान सारसरीजवळ आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत गारवा घटला आहे. पण पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतासह मध्य प्रदेश ते छत्तीसगडपर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. काही भागांत गारपिटीचीही शक्यता आहे. विदर्भात त्याचा किंचित परिणाम होऊ शकतो. ही स्थिती निवळल्यानंतर मात्र पुन्हा गारवा वाढण्याची शक्यता आहे.
रब्बी पिकांना फटका
गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीची पिके जोमात आली होती. मात्र, आता अधिकच्या थंडीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ज्वारीची कणसे भरली असून, त्यालाही या थंडीचा फटका बसणार आहे. शिवाय पहाटे पिकांवर दवबिंदू साचत असल्याने अनेक ठिकाणच्या पिकांसह फळबागांचे देखील नुकसान होणार आहे.
संसर्गजन्य आजारांची भीती
गेल्या 2 वर्षांपासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यातच संसर्गजन्य आजारांना सध्याचे वातावरण पोषक असल्याचे दिसून येते. वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला असून, यामुळे सर्दी, खोकला, ताप आदी विकार बळावण्याची शक्यता आहे. ज्यामुळे नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना सारख्या आजाराला बळी पडण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडावे. वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा, घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवून राहावे. तसेच, कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे.
हेही वाचा -Burn sugarcane in Nashik : गोदाकाठी 20 एकर ऊस जळून खाक ; निफाड तालुक्यातील शिंगवे शिवारातील घटना