कोचीन (केरळ): केरळचे कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ विद्यार्थिनींना मासिक पाळीत आराम मिळावा यासाठी अतिरिक्त सुट्टी देणार आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात महिला विद्यार्थिनींना दोन टक्के अतिरिक्त सूट देण्यास मान्यता देण्यात आल्याचे कोचीन विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता मासिक पाळीच्या दिवसात त्रास होत असल्यास विद्यार्थिनींना अतिरिक्त सुट्टीचाही लाभ घेता येणार आहे.
विद्यार्थी संघटनांची होती मागणी:विद्यापीठाच्या संयुक्त रजिस्ट्रारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'महिला विद्यार्थ्यांना मासिक पाळीच्या फायद्यांच्या विनंत्या विचारात घेतल्यानंतर, कुलगुरूंनी शैक्षणिक परिषदेला अहवाल देण्याच्या अधीन राहून, प्रत्येक सेमिस्टरमध्ये महिला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दोन टक्के अतिरिक्त सूट मंजूर केली आहे. या सुट्ट्या देण्याचे आदेशही दिले आहेत. विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळापासून विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान सुट्टीचा लाभ मिळावा यासाठी दबाव आणला होता.
सर्वोच्च न्यायालयातही आहे याचिका:दुसरीकडे, महिलांना मासिक पाळी दरम्यान दर महिन्याला कामावरून सुटी देण्यात यावी या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत असे म्हटले आहे की, मासिक पाळीदरम्यान महिलांना हृदयविकाराच्या झटक्याइतकाच वेदना होतात. याचिकेत पुढे म्हटले आहे की, भारतात अशा काही कंपन्या आहेत ज्या मासिक पाळीच्या दरम्यान रजा देतात. त्याचबरोबर काही राज्य सरकारेही मासिक पाळीच्या काळात महिलांना सुटी देतात, परंतु भारतातील प्रत्येक महिलेला मासिक पाळीच्या काळात रजा मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.