दुर्गापूर (प. बंगाल) :भाजप नेते आणिकोळसा माफिया राजेश उर्फ राजू झा यांची शनिवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या शक्तीगडमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एकेकाळी कोळशाच्या व्यवसायाचे बादशहा अशी ओळख असलेले राजू झा यांना 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे नवे सरकार आल्यानंतर कोळसा व्यवसायापासून रोखण्यात आले होते. तेव्हापासून राजू झा यांना अनेकवेळा विविध प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे.
या आधीही झाला होता हल्ला : राजू झा दुर्गापूरच्या पलाशदिहा मैदानावर भाजप नेते दिलीप घोष यांचासह भाजपमध्ये सामील झाले होते. पक्षात अर्जुन सिंह यांच्याशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी ठिकठिकाणी प्रचार केला होता. राजू हे भाजपच्या केंद्र, राज्य आणि स्थानिक नेत्यांसह भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर दिसत होते. काही दिवसांपूर्वीच दुर्गापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या राजू यांच्या परिवहन कार्यालयावर दोन राऊंड गोळीबार झाला होता.
जागीच मृत्यू झाला : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी राजू झा स्वतःच्या कारने कोलकाता येथे जात होते. त्यावेळी शक्तीगढ येथे त्यांच्या कारच्या शेजारी आणखी एक चारचाकी गाडी थांबली. त्या गाडीमधील हल्लेखोरांनी राजू झा यांच्या कारला लक्ष्य केले आणि गोळीबार केला. त्यांनी तीन गोळ्या झाडल्या, ज्यात राजू यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर कोणी हल्ला केला याचा तपास शक्तीगड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
सोबती गंभीर जखमी : कोलकात्याला जात असताना राजूंसोबत आंदलचे रहिवासी ब्रतीन बॅनर्जीही होते. त्यांची कार मिठाईच्या दुकानासमोर उभी असताना त्यांच्या शेजारी एक कार आली. या कारमधून राजू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ब्रतीन बॅनर्जींने कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी ब्रतीन बॅनर्जी यांची सुटका करून त्यांना बर्दवान येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात राजू झा यांचा जागीच मृत्यू झाला असून ब्रातिन बॅनर्जी यांच्यावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. डाव्या आघाडीच्या राजवटीत कोळसा व्यवहार करणाऱ्या सिंडिकेटचे प्रमुख बनलेले राजू यांची फार भरभराटीला झाली होती. राजेश उर्फ राजूंनी ट्रान्सपोर्ट व्यवसायापासून हॉटेल व्यवसायापर्यंत सर्व काही सांभाळले आहे.
हेही वाचा :Rahul Gandhi Home : काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याने राहुल गांधींच्या नावे केले त्यांचे घर!