भोपाळ - मध्य प्रदेशात 28 डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, या अधिवेशनावर कोरोनाचे सावट घोंगावू लागले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नियमानुसार सर्व सदस्य आणि कर्माचाऱ्यांची कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. त्या चाचणीमध्ये बरेचशे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे यावेळचे विधानसभा अधिवेशन घ्यायचे का नाही, याबाबत आज (रविवारी) सायंकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांनी केली कोरोना टेस्ट-
रविवारी सकाळी भोपाळ मध्ये मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान यांनी कोरोनाची टेस्ट करून घेतली आहे. चौहान हे यापूर्वी 25 जुलैला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली होती. आता विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आज पुन्हा कोरोनाची चाचणी करुन घेतली आहे.
2 दिवसात विधानसभेमध्ये 34 कर्मचारी पॉझिटिव्ह-
मध्यप्रदेश विधानसभा परिसरातील रुग्णालयामध्ये 2 दिवसात कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 77 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली असता 34 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा अथवा, अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय होऊ शकतो.
दोन आमदार कोरोनाबाधित-
विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी विधानसभा सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या रॅपिड कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. यामध्ये गाडरवाड़ाचे आमदार सुनिता पटेल आणि लखनादौनचे आमदार योगेंद्र सिंह यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर विधानसभेच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधासभेचे सभापती रामेश्वर शर्मा आणि विधानसभाचे प्रमुख सचिव एपी सिंह यांनी देखील कोरोना चाचण्या केल्या आहेत.