पाटणा (बिहार): रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने लालू आणि कुटुंबीयांवर केलेल्या कारवाईवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटणा ते दिल्लीपर्यंतच्या छाप्यांवर सीएम नितीश म्हणाले की, ते जे काही करत आहेत ते चुकीचे आहे. (2017)मध्ये आरजेडीवर छापेमारी झाली आणि आताही होत आहे. आम्ही एकत्र आलो त्यामुळे ही कारवाई होत आहे. भाजपला सोडून आम्ही पुन्हा आमच्या मुळ ठिकाणी आलो आहोत म्हणून हे सगळे केले जात आहे असही नितीश यावेळी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपने मोदी यांना बाजूला केले आहे. त्यामुळे त्यांना बोलतच राहावे लागेल असा टोला लगावला आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राला उत्तर : सीबीआय तपासाविरोधात विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले होते. मात्र, सीएम नितीश यांनी त्यावर सही केली नाही. यावर मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, वेगवेगळे पक्ष वेगवेगळे काम करतात. या सगळ्या गोष्टींची आम्हाला पर्वा नाही. त्यांना वाटेल तसे ते करतात. सात पक्ष एकत्र आहेत, सर्व काम करत आहेत. मला त्यावर बोलण्याची गरज नाही.