नवी मुंबई -देशातील प्राणघातक कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 54 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना बोलू न दिल्याचा आरोप केला. बैठकीत केवळ भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची परवानगी होती. आम्हाला बोलूच दिलं नाही, विरोधी पक्षाचे सर्व मुख्यमंत्री कठपुतळीसारखे बसून होते, असे त्या म्हणाल्या.
आमचा अपमान करण्यात आला. बैठकीत मोदींनी ऑक्सिजन किंवा रेमडिसीरच्या तुटवड्याबद्दल काहीही विचारले नाही. तसेच त्यांनी ब्लॅक फंगसबद्दल काहीही विचारले नाही. आम्हाला बैठकीत बोलावले मात्र, बोलू दिले नाही. भाजपाच्या काही मुख्यमंत्र्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिले आणि बैठक संपवली. ही एक प्रकारची प्रासंगिक भेट होती, असे ममता म्हणाल्या.
राज्यात लसांची तीव्र कमतरता आहे. आम्ही सुमारे 3 कोटी लसींची मागणी करणार होतो, परंतु काहीही बोलण्यास परवानगी नव्हती. या महिन्यात 24 लाख लस देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु केवळ 13 लाख लस देण्यात आल्या. लस नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र सरकारने राज्यातील मागणीनुसार लस पाठविली नाही. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. असे असूनही राज्य सरकारने खासगी पातळीवर 60 हजार कोटी रुपयांची लस खरेदी केली आहे, असे ममता यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.