लखनौ - प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळेच आम्हाला धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेे आहे. ते लखनौहून अयोध्येला जाताना माध्यमांशी बोलत होते.
उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिकांचे जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, की आमची भेट राजकीय भेट नाही. मी अयोध्येला भेट देत असतो. पण मुख्यमंत्री म्हणून येथे पहिल्यांदाच आलो आहे. प्रभू राम यांचे सर्वांनाच आशीर्वाद घ्यायचे होते. मला योगीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचे आभार मानायचे आहेत. कारण, ते आमचे स्वागत करण्यासाठी येथे आले आहेत.
योगी व पंतप्रधानांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केलेएकनाथ शिंदे विशेष विमानाने चौधरी चरणसिंग विमानतळावर सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचले. उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने जलशक्ती मंत्री स्वतंत्र सिंह त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर आले होते. स्वागतानंतर मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. श्री रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर व्हावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वप्न पूर्ण करताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपमध्ये बाळासाहेबांच्या काळापासून वैचारिक युती आहे. आमच्यामध्ये एक नैसर्गिक युती आहे. ही युती खूप पुढे जाणार आहे.