नवी दिल्ली -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Met Shivsena MP) यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde in Delhi) हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र सादर केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली आहे.
लोकसभा अध्यक्षांना पत्र -शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या १२ खासदारांनी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळा गट म्हणून ओळख मिळावी यासाठी अध्यक्षांना पत्र दिले आहे. खासदार भावना गवळी या आमच्या गटाच्या मुख्य प्रतोद असतील. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बंडखोरीच्या वाटेवर असलेल्या १२ पैकी ८ खासदार उपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्री यांचा दिल्ली दौरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्री अकराच्या सुमारास ते विमानाने दिल्लीला निघाले व दीड वाजता दिल्लीत पोहोचले. मंत्रिमंडळ विस्ताराचाही विषय अद्याप प्रलंबित आहे. भारतीय जनता पक्षाच्या ( Bjp ) ज्येष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीत ( Presidential Election ) शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु ( Draupadi Murmu ) यांना पाठिंबा जाहीर केला होता. द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्यात यावा यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर दबाव बनवला होता. खासदार राहुल शेवाळे, खासदार राजेंद्र गावित यांनी तर याबाबतचा पत्रच उद्धव ठाकरे यांना देऊन आपली भूमिका निवडणुकीआधीच स्पष्ट केली होती.
या १२ खासदारांचा समावेश - धैर्यशील संभाजीराव माने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव गणपतराव जाधव, कृपाराव गवळी, कृपाराव जाधव, तुळशी पाटील अशी या खासदारांची नावे आहेत.
ठाकरेंकडे 6 खासदार - राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला एकामागेएक हादरे देण्यास सुरुवात केली आहे. चाळीस आमदारांच्या बंडानंतर खासदार बंड करणार असल्याची चर्चा होती. खासदारांचे बंड थोपवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. मात्र, आज १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना चिन्हावर १८ खासदार निवडून आले होते. त्यापैकी १२ खासदारांनी शिंदे गटात गेले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ सहा खासदार उरले आहेत.
न्यायालयीन प्रक्रिया - शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात अपात्र करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी त्रीसदस्य खंडपीठांसमोर सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने आपली कायदेशीर बाजू योग्य असल्याचा दावा केला आहे. मात्र न्यायालय यावर काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदारकी रद्द होऊ शकते. तर शिवसेनेचा दावा फोल ठरवल्यास शिंदे गटाला विधिमंडळात अधिकृत मान्यता मिळू शकते. त्यामुळे शिवसेनेच्या भवितव्याचा प्रश्न येत्या बुधवारी होणार असून न्यायालय काय फैसला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.