नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २१व्या शतकातील पंतप्रधान सुशिक्षित असावेत की नाही हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश आला आहे की पंतप्रधानांच्या पात्रतेबाबत माहिती घेऊ शकत नाही. या आदेशानंतर संपूर्ण देश हादरला आहे. कारण आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीत प्रश्न विचारण्याचे, माहिती विचारण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. कुणी कमी शिकलेला असणं हा गुन्हा नाही, कुणी अशिक्षित असणं हा गुन्हा नाही. पाप नाही. आपल्या देशात गरिबी इतकी आहे की अनेकांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही असही ते म्हणाले आहेत.
सुशिक्षित पंतप्रधान असे बोलत नाहीत : मी पंतप्रधानांच्या अभ्यासाची ही माहिती का मागितली, असे केजरीवाल म्हणाले. आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत. देशाला पाहिजे तशी प्रगती करता आली नाही. आज लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे, लोकांना खूप वेगाने प्रगती करायची आहे. २१व्या शतकातील तरुणांना प्रगती हवी आहे. त्यांना रोजगार हवा आहे, महागाईपासून मुक्ती हवी आहे. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांनी सुशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण पाहतो की, पंतप्रधानांची काही विधाने अशी येतात की देश खवळतो. नाल्यातून बाहेर पडणारा वायू चहा बनवण्यासाठी ऊर्जा म्हणून वापरता येतो. सुशिक्षित पंतप्रधान असे बोलत नाहीत. पंतप्रधानांना विज्ञान माहीत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.