नवी दिल्ली -राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. या बैठकीत केजरीवाल यांनी तज्ज्ञांना विश्लेषण करण्याचे निवेदन दिले आहे. तसेच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचेही निर्देश दिले आहेत. यामुळे मृत्यूचे कारण समजण्यास मदत होऊन मृत्यू रोखण्यास सरकारला योग्य ती पावले उचलण्यास मदत होईल.
नोव्हेंबरमध्ये परिस्थिती वाईट -
दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. गेल्या एका आठवड्याबाबत बोलायचे झाल्यास शंभरच्या जवळपास लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. सरकारला लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक प्रत्येक आठवड्याला होत आहे. याच बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दररोज होत असलेल्या मृत्यूचे विश्लेषण करण्याबाबत तज्ज्ञांना निर्देश दिले आहेत.