नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत दिली. एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मेघवाल यांनी संसदेत ही माहिती दिली.
प्रस्तावावर सकारात्मक विचार
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली. या विषयावर विचार करण्यासाठी एका आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मराठीलाही अभिजात दर्जा देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. सरकार या दृष्टीने सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहे असे मेघवाल प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान म्हणाले.