हैदराबाद :सोमवारी महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शीख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच सर्व धर्मगुरू यांच्याशी चर्चा करून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत तसेच गुरुद्वारामध्येच हा उत्सव करण्याचे ठरले होते. मात्र, काही जणांनी वाद घालत पारंपारिक मार्गाने मिरवणूक काढण्याचा आग्रह धरत पोलिसांवरच हल्ला चढवला. सोमवारी सायंकाळी चार वाजेताच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान पोलिसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेट्स तोडले. या हल्ल्यात पोलीस अधीक्षकांसह चार पोलीस अधिकारी जखमी झाले होते.
आज (मंगळवार) सकाळपर्यंत याप्रकरणी १८ लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत विविध कलमांतर्गत ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली आहे. गुरुद्वारा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सध्या परिसरात शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे निहंगांचे पोलिसांवर होणारे हल्ले पुन्हा चर्चेत आले आहेत. पाहूयात गेल्या काही वर्षांमधील अशा काही घटना...
- २७ डिसेंबर २०१९ :
पंजाबच्या पटियालामधील नरारु गावात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. त्यानंतर झालेल्या गदारोळात शीखांनी केलेल्या तलवार हल्ल्यात सुमारे १२ जण जखमी झाले होते. यांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश होता. पोलिसांनी मात्र आपण लाठीचार्ज केला नसल्याचे सांगत, केवळ आंदोलक आणि समन्वयक यांच्यामध्ये होणारा वाद टाळण्यासाठी आपण मध्यस्थी केली होती असे स्पष्ट केले होते.
- ११ एप्रिल २०२० :
पंजाबच्या पटियाला जिल्ह्यामध्ये निहंगांच्या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले होते. यामध्ये एका पोलिसाचा हातही कापला गेला होता. बाहेर फिरण्यास मज्जाव केल्याच्या रागातून या व्यक्तींनी पोलिसांवर हल्ला केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, निहंग जमातीचे चार ते पाच लोक गाडीने प्रवास करत होते. पहाटे सहाच्या सुमारास मंडी बोर्ड पोलिसांनी त्यांना अडवून, बाहेर फिरण्यासाठीच्या पासबाबत विचारणा केली. त्यांना थांबण्यास सांगितले असता, त्यांनी बॅरिकेट्सवर सरळ गाडी धडकवली, आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हरजीत सिंग या सहाय्यक उपनिरिक्षकाचा हातही कापला गेला होता.