कारगिल :राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कारगिलमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. आपल्या भाषणात राहुल गांधींनी भारत-चीन सीमा प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. तसेच लडाखचे मुद्दे आपण संसदेत मांडणार असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.
चीनने भारताची जमीन बळकावली : 'लडाख हे मोक्याचं ठिकाण आहे. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, चीनने भारताची जमीन बळकावून घेतलीय. मात्र विरोधी पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, लडाखचा एक इंच भागही चीनने घेतला नाही. पंतप्रधानांचं असं खोटं बोलणं हे दु:खद आहे. पंतप्रधान खोटं बोलत आहेत', असा घणाघात राहुल गांधींनी केला.
..म्हणून लडाखला मोटारसायकलवरून गेलो : पुढे बोलताना राहुल गांधींनी काश्मीरमधील 'भारत जोडो यात्रे'चा उल्लेख केला. 'काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चालत गेलो. या यात्रेचा उद्देश भाजपा-आरएसएसने देशात पसरवलेला द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात उभे राहणे हा होता. गेल्या काही दिवसांत हे मला स्वतःला बघायला मिळालं. हिवाळ्यात बर्फ पडत असल्यामुळे यात्रेदरम्यान मला लडाखला भेट देता आली नाही. त्यामुळे मी आता यावेळी मोटारसायकलवरून लडाखला गेलो', असे राहुल गांधी म्हणाले.
या आधीही केले होते असे आरोप : रविवारी, २० ऑगस्टला राहुल गांधींनी बाईकवरून लडाखच्या पॅंन्गॉग लेकला भेट दिली होती. तेथे त्यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर अशाच प्रकारचे आरोप केले होते. 'चीनने भारताची जमीन बळकावल्याचा दावा करत, मोदी यावर खोट बोलतायेत', असे राहुल गांधी म्हणाले होते. 'स्थानिक जनता चीनने आपली जमीन घेतल्याचे सांगत आहेत', असा दावाही त्यांनी केला होता. 'केंद्राने जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. मात्र या निर्णयामुळे स्थानिक जनता नाराज आहे. लडाखमध्ये बेरोजगारी प्रचंड आहे. त्यामुळे तेथील जनतेला अधिक प्रतिनिधित्व हवंय', असं राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचा :
- Rahul Gandhi On Pm Modi : चीननं हडपली भारताची जमीन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा खोटा; लडाखमध्ये राहुल गांधी यांचा हल्लाबोल
- Rahul Gandhi : लडाखच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसले राहुल गांधी; लोक म्हणाले, 'धूम 4 चा हिरो मिळाला'