नवी दिल्ली -भारत-चीन या दोन्ही देशांदरम्यान गेल्या एक वर्षापासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन सैनिकांसोबत भारतीय जवानांची चकमक झाली होती. या चकमकीचा एक व्हिडिओ चीनकडून जारी करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 45 सेंकदाचा आहे. आपल्या सैनिकांची बहादूरी दाखवण्यासाठी चीनकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. मात्र, त्यांचा डाव त्यांच्यावर उलटा पडला असून चीन जागतिक समुदायासमोर उघडा पडला आहे.
व्हिडिओमध्ये चिनी सैनिक दगडफेक करताना दिसून येत असून त्यांनीच हिंसा केल्याचे समोर आले आहे. गलवान नदीमध्ये भारतीय जवान चिनी सैनिकांचा शोर्याने सामना करत असून चिनी सैनिक उंचीवरून जवानांवर दगडेफक करत असल्याचे व्हिडिओत दिसते. व्हिडिओत रात्रींच्या अंधारातील ही काही दृश्य असून मोठा आरडाओरड होतानाचे पाहायला मिळत आहे.
भारताचे 20 जवान शहीद -
15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारतीय सैन्यदलाचे 20 जवान शहीद झाले होते. भारत-चीन सैन्यादरम्यानचा गेल्या चार दशकांतील हा सर्वात हिंसक तणाव असल्याचे यानंतर सांगितले गेले. भारताने या घटनेनंतर लगेचच आपले सैनिक शहीद झाल्याची माहिती जारी केली होती. मात्र, चीनने याविषयी कसलिही अधिकृत माहिती जारी केली नव्हती. चकमकीच्या बऱ्याच काळातनंतर चीनने आपले जवान ठार झाल्याची कबुली देत जवानांची माहितीही सार्वजनिक केली आहे. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात रशियन वृत्तसंस्था टासने गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत चीनचे 45 जवान ठार झाल्याचे म्हटले होते.