बीजिंग : चीनने सोमवारी त्यांचा एक अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशात अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन प्रदेश, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र यासह इतर वादग्रस्त प्रदेश चीनचा भाग दाखवण्यात आलाय. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मात्र अरुणाचल प्रदेश हा आपला अविभाज्य भाग असून तो नेहमी तसाच राहील, असं भारतानं वारंवार स्पष्ट केलंय. त्यामुळे आता भारत सरकार यावर काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्वाचं आहे.
ग्लोबल टाइम्सनं ट्विट केलं : चीन सरकारचं अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनं X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलं, 'चीनच्या मानक नकाशाची २०२३ आवृत्ती सोमवारी अधिकृतपणे प्रसिद्ध झाली. नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या मालकीच्या मानक नकाशा सेवेच्या वेबसाइटवर ती प्रसिद्ध करण्यात आली. चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमांच्या आधारे हा नकाशा तयार करण्यात आलाय', असं एक्सवर म्हटलंय. विशेष म्हणजे, चीनने यापूर्वीही अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावं बदलली आहेत.
चीनकडून वेळोवेळी असा नकाशा जारी : भारताचा चीनसोबतचा सीमावाद जुना आहे. लडाख आणि अरुणाचल प्रदेशात भारताची सीमा चीनला लागून आहे. या ठिकाणी सीमेवर अनेकदा वाद झालेत. भारतातील मोठ्या भूभागावर चीनचा फार पूर्वीपासूनचा दावा आहे. चीनकडून अशाप्रकारे वेळोवेळी नकाशा जारी केला जातो, ज्यामध्ये तो भारतीय भूभाग आपल्या क्षेत्रात दाखवतो. २०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये यावरूनच तणाव निर्माण झाला होता. तर मागच्या वर्षीही अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारतीय सैन्याची चीनी लष्करासोबत चकमक झाली होती.
हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा : खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी केंद्र सरकारला जाब विचारलाय. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले होते. तेथे त्यांनी शी जिनपिंग यांना अभिवादन केले. त्यानंतर चीनने हा नकाशा जारी केला. लडाखमधील पॅंगॉन्ग खोऱ्यात चीन घुसल्याचा राहुल गांधींचा दावा खरा आहे. चीन अरुणाचल प्रदेशातही प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. केंद्र सरकारमध्ये हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा, असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय.
हेही वाचा :
- Modi Jinping Meet : सीमेवर तणाव अन् मोदी-जिनपिंग यांच्यात भेट; दोन नेत्यांमध्ये काय झाली चर्चा?
- Sanjay Raut News : राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हल्ला होण्याची भीती-संजय राऊत