तेजपूर (आसाम) China Occupied India Land : "१९६२ च्या युद्धापासून चीननं भारताची ३८,००० चौरस किलोमीटर जमीन बळकावली आहे. ही भूमी परत मिळवण्यासाठी देशाच्या संसदेनं, गमावलेली जमीन परत मिळवण्याचा ठराव संमत केला होता. मात्र युद्धाला ६१ वर्षे उलटूनही ती भूमी परत मिळवण्याचा प्रयत्न झाला नाही", असा गंभीर आरोप इंडो-तिबेट समन्वय मंचाचे राष्ट्रीय सरचिटणीस कौंतेय जयस्वाल यांनी केला आहे. ते आसामच्या तेजपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
तिबेटींना वारंवार धमकावलं जातंय : "राष्ट्रपतींना आधीच एक अहवाल सादर केला गेलाय. यापूर्वीचा प्रस्ताव पुन्हा संसदेत मांडता यावा यासाठी देशातील जवळपास सर्वच खासदारांना त्याच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत", असं कौंतेय जयस्वाल यांनी सांगितलं. तिबेटवर सध्या चीनना कब्जा आहे. हे भारतासाठीही धोकादायक आहे, कारण चीननं अरुणाचल प्रदेशासह लडाखमधील तिबेटींना वारंवार धमकावलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
कैलास मान सरोवराजवळील भूभागावर कब्जा : कौंतेय जयस्वाल यांनी पुढे बोलताना आणखी गंभीर आरोप केले. "१९६२ च्या युद्धात ४,००० हून अधिक भारतीय सैनिक मरण पावले. याला जबाबदार तत्कालीन केंद्र सरकार आहे, कारण त्यांनी तेव्हा भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं वापरली नाहीत," असा आरोप त्यांनी केला आहे. चीननं तिबेटमधील कैलास मान सरोवराजवळील मोठ्या भूभागावर कब्जा केला असल्याचा दावाही समन्वय मंचानं केला आहे.
संपूर्ण तिबेटवर चीनचा कब्जा : चीननं सध्या संपूर्ण तिबेटवर कब्जा केला आहे. इंडो-तिबेट समन्वय मंच गेली अनेक वर्ष तिबेटला चिनी जोखडापासून मुक्त करण्यासाठी लढा देत आहे. आसामच्या तेजपूर येथे ९ आणि १० डिसेंबर रोजी भारत-तिबेट समन्वय मंचाचं दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात, तिबेटच्या मुक्तीसाठी भारतातील विविध राज्यांमधून एकजुटीचा संदेश देत मागण्या आणि ठराव स्वीकारले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला उत्तर पूर्व विभागीय सचिव दीपेन मोहंता यांच्यासह अनेक राष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती उपस्थित होत्या.
हे वाचलंत का :
- "पाकव्याप्त काश्मीर नेहरूंची चूक, कलम ३७० आधीच हटवायला हवं होतं", अमित शाह यांचा लोकसभेतच आरोप
- मणिपुरातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेनं हत्यारं टाकले, आतापर्यंतचा सर्वात मोठा शांतता करार
- "तेव्हा दुसरा काही पर्यायच नव्हता", अमित शाहंच्या नेहरूंवरील टीकेला फारुख अब्दुल्लांचं उत्तर