नवी दिल्ली : चीननं सोमवारी एक अधिकृत नकाशा जाहीर करत अरुणाचल प्रदेश, अक्साई चिन, तैवान आणि विवादित दक्षिण चीन समुद्र क्षेत्रांवर आपला दावा सांगितला होता. आता भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलंय. भारतानं मंगळवारी जारी केलेल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या भूभागावरील चीनचा दावा साफ फेटाळून लावला.
भारताने चीनचे सर्व दावे फेटाळले : या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी भूमिका मांडली. 'भारताच्या भूभागावर दावा करणाऱ्या चीनच्या तथाकथित नकाशावर आम्ही राजकीय माध्यमांद्वारे तीव्र निषेध नोंदवलाय. आम्ही चीनचे सर्व दावे फेटाळतो. या दाव्यांना कोणताही आधार नाही. चीनच्या अशा भूमिकेमुळे सीमाप्रश्न आणखी गुंतागुंतीचा होतोय', असं बागची म्हणाले.
चीन इतर देशांमध्येही आक्रमकता दाखवत आहे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील चायना स्टडीजचे प्राध्यापक श्रीकांत कोंडापल्ली यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या प्रकरणावर आणखी प्रकाश टाकला. 'शी जिनपिंग यांनी २०१२ मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून सार्वभौमत्वाच्या मुद्द्यांवर भर दिलाय. चीनच्या दाव्याला बळ देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जमीन सीमा कायदा मंजूर करण्यात आला. चीन हा रशिया, कझाकस्तान आणि इतर देशांमध्येही अशीच आक्रमकता दाखवत आहे. हे सर्व हेच सूचित करते की, भारताने आपल्या धोरणात सक्रिय असणं आवश्यक आहे. भारताला दुर्गम भागांवर आपलं नियंत्रण मजबूत करणं, पायाभूत सुविधा विकसित करणं आणि सैन्याची जमवाजमव करणं गरजेचं आहे', असं ते म्हणाले.