बीजिंग ( चीन ) : चीनने शनिवारी कोविड -19 मुळे गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीपासून रुग्णालयांमध्ये 60,000 मृत्यू झाल्याची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेने चीनवर कोरोनाकाळात मृतांची आकडेवारी चुकीची दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर आता चीनचे हे पाऊल पुढे टाकले आहे. मृतांच्या दाखवल्या जाणाऱ्या संख्येपेक्षा ही संख्या अजूनही कमी असण्याची शक्यता चीनकडून वर्तवण्यात येत आहे. चीन सरकारने दावा केला आहे की कोरोनाची लाट ओसरत चालली आहे.
चीनकडून स्पष्टीकरण :कोरोनाच्या गंभीर परिस्थितीची माहिती लपवल्याचा आरोप चीनवर करण्यात आला होता. सर्वस्तरातून चीनवर टीका होत होती. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी सांगितले की, 8 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत देशातील रुग्णालयांमध्ये कोविड-19 मुळे 59,938 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे वरिष्ठ अधिकारी जिओ याहुई यांनी सांगितले की, 5,503 लोकांचा श्वसनाच्या समस्येमुळे मृत्यू झाला आहे. तर 54,435 लोकांचा कोविड-19 सोबत इतर आजारांमुळे मृत्यू झाला आहे. त्याशिवाय अन्य कारणानेही काही लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
संक्रमीत 90 टक्के लोक 65हून अधिक वयाचे :कोरोना महामारीविरोधात चीन सरकारने अचानक उपाययोजना उचलल्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला कोविड-19 प्रकरणे आणि मृत्यूची नोंद थांबवण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने चीनला याबाबत अधिक माहिती देण्यास सांगितले होते. मृत्यू झालेल्यांचे सरासरी वय 80.3 वर्ष असल्याची माहिती स्थानिक वृतसंस्थेने दिली होती. एकूण मृतांपैकी 90 टक्के लोक 65 किंवा त्याहून अधिक वयाचे होते. सध्या चीनने दररोज कोविडची आकडेवारी देणे बंद केले आहे. चीनने जवळपास तीन वर्षांनंतर 8 जानेवारी रोजी आपल्या सीमा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी पुन्हा उघडल्या आहेत.
64 टक्के लोकसंख्येला व्हायरसची लागण :आरोग्य तज्ञांनी सांगितले की, हा विषाणू देशात सर्वात वेगाने पसरला आहे आणि दररोज लाखो लोकांना संसर्ग होत आहे. देशातील 64 टक्के लोकसंख्येला व्हायरसची लागण झाल्याचा अंदाज आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की चीन' वेळेवर, मुक्त आणि पारदर्शक पद्धतीने' कोविडशी संबंधित डेटा सर्वांसमोर मांडत आहे.
हेही वाचा :Pakistan Crisis : आर्थिक हलाखीमुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात, श्रीलंकेसारखी परिस्थिती होणार?