तिरुवनंतपुरम (केरळ) - केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) सूत्रांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री सध्या उत्तर केरळमधील कन्नूर येथे त्यांच्या निवासस्थानी आहेत.
मुख्यमंत्र्यांना कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये हलवले जाऊ शकते, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन आणि सून पी ए मोहम्मद रियास यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यानंतर पिनराई यांनी कोरोना चाचणी केली होती. पिनराई विजयन यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली. तसेच संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन राहण्याचे आवाहन केले.
केरळ विधानसभा निवडणूक -
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. विधानसभेच्या 140 जागांसाठी 6 एप्रिल 2021 मतदान पार पडले. राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक होती. सध्या केरळात माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. 140 जागांसाठी एकूण 957 उमेदवार रिंगणात होते.या निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील.
कोरोनाचा वाढता प्रसार -
यापूर्वी अनेक राजकीय व्यक्ती व लोक प्रतिनिधींना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतचं भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नी चेनम्मा यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणारे मृत्यूचे प्रमाण प्रशासनाच्या चिंतेत भर घालणार आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.