पणजी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोव्यातही 'टीका उत्सव' आयोजित केला जाणार आहे. तो 20 एप्रिलपर्यंत आणि आवश्यकता भासल्यास 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. शुक्रवार पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांच्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
दि.11 ते 14 एप्रिल या काळात राष्ट्रीय स्तरावर कोविड प्रतिबंधक लसिकरणाचा 'टीका उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गोव्यात यशस्वी करण्यासाठी पक्षाचे आमदार, पंचायत सदस्य, पक्ष पदाधिकारी यांच्याकडून लोकांमध्ये अधिकाधिक जागृती व्हावी. लोक लसीकरणास पुढे यावेत, त्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.