नवी दिल्ली Chief Guest at Republic Day 2024 Parade : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याऐवजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रजासत्ताक दिन सोहळ्याला (26 जानेवारी 2024) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी भारताकडून मिळालेल्या निमंत्रणाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. यासंदर्भात इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर अधिकृत पोस्ट केलीय. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. मॅक्रॉन या कार्यक्रमास उपस्थित राहणारे सहावे फ्रेंच नेते असतील.
फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी अतिथी म्हणून होते उपस्थित :मागील काही वर्षांमध्ये भारत आणि फ्रान्समधील संबंधांमध्ये प्रगती झालीय. या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून भाग घेतला होता. त्याचवेळी, संरक्षण मंत्रालयानं स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांत या विमानवाहू जहाजावर तैनात करण्याच्या उद्देशानं फ्रान्सकडून 26 राफेल (सागरी) जेट खरेदी करण्यास मान्यता दिली होती. भारतानं विमानं खरेदी करण्याच्या सुरुवातीच्या निविदांना फ्रान्सनं प्रतिसाद दिलाय. दोन्ही देश सागरी क्षेत्रात, विशेषत: हिंदी महासागर क्षेत्रात सहकार्य वाढवत आहेत.
जो बायडेन यांचा दौरा रद्द का : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचं निमंत्रण नाकारलंय. बायडेन यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळं त्यांनी निमंत्रण नाकारल्याचं बोललं जातंय. त्यांना स्टेट ऑफ द युनियनला संबोधित करायचं आहे. तसंच पुढील वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी करायची आहे. याशिवाय वॉशिंग्टनचं लक्ष इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर आहे, त्यामुळं बायडेन पाहुणे म्हणून येऊ शकणार नाहीत.
2013 ते 2023 पर्यंत प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते : यावर्षी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात (26 जानेवारी 2023) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोरोना कालावधीमुळं 2021 आणि 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे नव्हते. त्याआधी 26 जानेवारी 2020 रोजी ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती जैर बोलसोनारो प्रमुख पाहुणे होते. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, 2018 मध्ये सर्व 10 आशियाई देशांचे नेते, 2017 मध्ये अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, 2016 मध्ये फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस ओलांद, 2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा, 2014 मध्ये तत्कालीन जपानचे अध्यक्ष पंतप्रधान शिंजो आबे आणि 2013 मध्ये भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभाला उपस्थित होते.
हेही वाचा :
- २०२४ मध्ये मोदी Vs खरगे सामना रंगणार? 'INDIA' बैठकीत ममता बॅनर्जींचा प्रस्ताव
- प्राणाची बाजी लावून भारतीय जवानांनी मिळवला पाकिस्तानवर विजय, केला बांगलादेश स्वतंत्र