कांकेर (छत्तीसगड) Chhattisgarh Election 2023 : तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचीच प्रचिती मंगळवारी छत्तीसगडमध्ये आली. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. येथील कांकेर जिल्ह्यातल्या पखांजुरमध्ये ट्रान्सजेंडरसाठी खास मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. 'रेनबो मतदान केंद्र' असं त्याचं नाव. विशेष म्हणजे, या मतदान केंद्राचे सुरक्षा कर्मचारीही ट्रान्सजेंडरच आहेत. मतदानाच्या दिवशी सकाळीच ट्रान्सजेन्डर या रेनबो मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचले होते.
फुलांचा वर्षाव करून स्वागत : या रेनबो मतदान केंद्रांवर जेव्हा ट्रान्सजेन्डर मतदानासाठी आले तेव्हा मतदार मित्रांनी त्यांचं फुलांचा वर्षाव आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर त्यांना मतदान केंद्रावर नेण्यात आलं. तिथे या ट्रान्सजेन्डर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी या मतदारांंचा चेहरा अभिमानानं फुलला होता. त्यांनी या उपक्रमाबद्दल जिल्हा प्रशासनाचं आभार मानलं आहे.