बस्तर (छत्तीसगड) Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान नक्षली हिंसाचार झाला आहे. कांकेर, नारायणपूर, विजापूर आणि सुकमा येथे चकमकी झाल्या. तर दंतेवाडा येथे आयईडी जप्त करण्यात आले. कांकेरमध्ये चकमकीत एका शेतकऱ्याच्या पोटात गोळी लागली. तर विजापूरमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे.
शेतकऱ्याच्या पोटात गोळी लागली : कांकेरच्या बांदे येथील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सुमारे अर्धा तास गोळीबार सुरू होता. त्यानंतर नक्षलवादी फरार झाले. या चकमकीत एका शेतकऱ्याच्या पोटात गोळी लागली. हा शेतकरी आपली गुरं चारण्यासाठी शेतात आला होता. घटनास्थळावरून ४७ शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय अनेक नक्षलवादीही ठार झाल्याची बातमी येत आहे.
२ ते ३ नक्षलवादी ठार : नारायणपूरच्या ओरक्षा येथे एसटीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, नक्षलवादी जंगलाच्या आडून पळून गेले. याशिवाय सीआरपीएफ जवानांनी दंतेवाडा विधानसभा मतदारसंघात झडतीदरम्यान दोन आयईडी जप्त केले आहेत. विजापूरच्या गांगलूरमध्ये देखील नक्षलवाद्यांशी चकमक झाली. सीआरपीएफच्या ८५ बटालियनसोबत ही चकमक झाली. या चकमकीत २ ते ३ नक्षलवाद्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलांनी केलाय.