जगदलपूर (छत्तीसगड) Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये आज (७ नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावेळची निवडणूक बस्तर क्षेत्रासाठी खास आहे. कारण इथल्या जगदलपूर जिल्ह्यातील चांदामेटा गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच मतदान होतंय. मतदानानंतर या नक्षलग्रस्त गावातील लोकांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता.
गावात नक्षल्यांचा प्रभाव आहे : छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागात असलेल्या चांदामेटा गावात नक्षल्यांचा प्रभाव आहे. यापूर्वी या भागात नक्षलवाद्यांचा कायम वावर असायचा. येथे नक्षलवाद्यांचं प्रशिक्षण शिबिरही होतं. तिथे नक्षलवादी त्यांच्या सैनिकांना प्रशिक्षण देत असत. नक्षलवाद्यांचं हे प्रशिक्षण स्थळ येथे आजही अस्तित्वात आहे. सुमारे वर्षभरापूर्वी सुरक्षा दलांनी येथे छावणी सुरू केली. त्यानंतर शाळा उघडण्यात आली आणि आता मतदान केंद्र सुरू झालं.
किती मतदार आहेत : यंदाच्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत नक्षलग्रस्त चांदामेटा गावात प्रथमच मतदान केंद्र बनवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ७ नोव्हेंबरला या गावातील लोकांनी त्यांच्या गावात मतदान केलं. घरापासून काही अंतरावर असलेल्या प्राथमिक शाळेत जाऊन मतदान करण्यासाठी गावकरी खूप उत्साही दिसत होते. गावातच मतदान करताना खूप आनंद होत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.