श्योपूर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील वन्यजीव सफारीचे नाव ऐकल्यावर पन्ना व्याघ्र प्रकल्प, कान्हा राष्ट्रीय उद्यानातील वाघांची गर्जना इत्यादी चित्रे तुमच्या डोळ्यासमोर येतील, आता त्यात आणखी एक नाव जोडले जाणार आहे, ते म्हणजे कुनो नॅशनल पार्क! पर्यटक आता मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता सफारीचा आनंद घेऊ शकतात. गेल्या वर्षी नामिबियातून आणलेले चित्ते आता इथल्या वातावरणात मिसळले आहेत. आता सर्वसामान्यांना लवकरच हे चित्ते पाहायला मिळणार आहेत. कुनो राष्ट्रीय उद्यानात फेब्रुवारी महिन्यापासून चित्ता सफारीला परवानगी दिली जाणार आहे.
कुनो नॅशनल पार्कमध्ये कसे पोहचाल : तुम्हाला कुनो नॅशनल पार्कमध्ये जायचे असेल तर आधी तुम्हाला मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात पोहोचावे लागेल. याशिवाय तुम्हाला कुनो नॅशनल पार्कला शिवपुरीतूनही जाता येते. श्योपूर ते कुनो नॅशनल पार्क हे अंतर 64 किमी आहे तर शिवपुरी जिल्ह्यापासूनचे अंतर सुमारे 75 किमी आहे. तिथे राहण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि धर्मशाळा आहेत. चित्ता सफारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सहजपणे ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात. यासाठी तुम्हाला जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पर्यटकांची सोय लक्षात घेऊन तिकीट बुक करण्यासोबतच पर्यटक जीवनावश्यक वस्तूही बुक करू शकतात, असे वन विभागाने म्हटले आहे.