रांची:'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या झीशान कादरीविरोधात रांचीच्या हिंदपिरी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रांचीमधील एका हॉटेलचे २९ लाख रुपये न भरल्याबद्दल झीशान कादरीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (FIR lodged against Zeeshan Qadri)
काय आहे संपूर्ण प्रकरण :रांचीच्या मुख्य मार्गावर असलेल्या हॉटेल एव्हीएन ग्रँडचे मालक विशाल शर्मा यांनी जिशान कादरीविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. नोंदवलेल्या एफआयआरमध्ये विशाल शर्माने सांगितले की, धनबादचा रहिवासी जिशान कादरी याने वेब सीरिजच्या शूटिंगसाठी त्याच्या हॉटेल्स एव्हीएन ग्रँड आणि एव्हॉन प्लाझामध्ये रूम बुक केल्या होत्या. वेब सीरिजची अभिनेत्री सौंदर्या शर्मासह अनेक कलाकार दोन्ही हॉटेलच्या रूममध्ये थांबले होते. जीशान कादरीचे वडील सईद इम्रान कादरी हेही बुक केलेल्या रूममध्ये राहायचे, जवळपास अडीच महिन्यांपासून वेब सीरिजच्या शूटिंगच्या नावाखाली दोन्ही हॉटेल्समध्ये खोल्या बुक करण्यात आल्या होत्या.