श्रीहरीकोटा(आंध्र प्रदेश) - बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडरनं (Vikram Lander) आपलं काम सुरू केलं आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याआधीच्या क्षणाचा एक व्हिडिओ इस्रोनं 'एक्स' (ट्विट) केला. विक्रम लँडरमधील इमेजर कॅमेर्याने चंद्रावर उतरण्याआधीच एक व्हिडिओ शूट केला.
इस्रोनं जारी केला व्हिडिओ - रोव्हर लँडरमधून बाहेर आल्यावर त्याने आपलं काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चंद्रयानाबाबत सध्या सर्वकाही ठीक सुरू असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. इस्रोने गुरुवारी संध्याकाळी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्याआधीचा व्हिडिओ जारी केला.
पुढील 14 दिवस महत्त्वाचे - इस्रोची 'चंद्रयान 3' मोहीम यशस्वी झाली. मात्र, पुढील 14 दिवस महत्त्वाचे आहेत. चंद्रयान 3 पुढील 14 दिवस चंद्रावर अभ्यास करणार आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पृथ्वीवर पाठवेल. चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या खनिजांचे घटक आहेत का, याबाबतही संशोधन रोव्हर करणार आहे.
रोव्हरनं केली कामाला सुरुवात - चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर चंद्रयानातील रोव्हर विक्रम लँडरमधून खाली आलं असून ते चंद्रावर फिरत आहे. चंद्रावरील मातीत चंद्रयान 3 मधील रोव्हरचे ठसे उमटत असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक उन्नीकृष्णन नायर यांनी दिली. गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास विक्रम लँडरमधून रोव्हर खाली आलं. या रोव्हरनं चंद्रावरील मातीत आपले ठसे सोडल्याचंही संचालक उन्नीकृष्णन नायर यांनी स्पष्ट केलं.
रोव्हर चंद्राचे नमुने गोळा करुन पाठवणार लँडरला - रोव्हर चंद्राचे नमुने गोळा करुन ते लँडरला डाटा पाठवेल. तर विक्रम लँडर तो डाटा बंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) येथील मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्सला पाठवेल, अशी माहिती संचालक उन्नीकृष्णन यांनी दिली. विक्रम लँडर नियोजित जागेवर उतरलं की नाही, याबाबत मुल्यांकन करावं लागेल, मात्र सारं काही नियोजित योजनेनुसार घडल्याचंही संचालक उन्नीकृष्णन नायर यांनी यावेळी सांगितलं आहे.
हेही वाचा -
- चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पुढील 14 दिवस का महत्त्वाचे?
- Chandrayaan 3 : चंद्रयान 3 च्या यशानंतर अंतराळापासून भारत विश्वगुरू बनण्याची झाली सुरुवात - राज्यमंत्री जितेंद्र सिंह
- चंद्रयान 3 देशाचा गौरव, सोनिया गांधींचे इस्रो प्रमुखांना अभिनंदन पत्र