बंगळुरू : Chandrayaan ३ : भारतानं चंद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्यानं जगभरातून इस्रोचं कौतुक करण्यात आलं. मात्र आता चंद्रयान 3 मोहिमेतील लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' स्लिप मोडवर आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ चंद्रावर पहाट होताच, सौर उर्जेवर चालणाऱ्या लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' यांच्याशी संपर्क प्रस्थापित करुन त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहेत. चंद्रावर रात्र होण्याच्या अगोदर 2 आणि 4 सप्टेंबरला लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' दोन्ही स्लीप मोडवर गेले होते.
इस्रो करत आहे सक्रिय करण्याचा प्रयत्न :इस्रोनं आपलं लँडर 'विक्रम' चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर उतरवलं आहे. त्यामुळे या प्रदेशात सूर्यप्रकाश दिसणं आता कठिण असल्यानं लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' स्लीप मोडवर गेले आहेत. त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आता सूर्यप्रकाश दिसण अपेक्षित आहे. त्यामुळे लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान'चे सौर पॅनल आता चार्ज करणं शक्य होणार आहे. भारतीय अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' यांच्याशी संपर्क प्रस्थापित करुन त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
चंद्रावर सूर्योदयानंतर पोहोचणार सूर्यप्रकाश :चंद्रावर रात्री तापमान अगदी खाली गेल्यानं सौर पॅनल चार्ज करणं शक्य नाही. याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी माहिती दिली आहे. 'आम्ही लँडर आणि रोव्हर दोन्ही स्लीप मोडवर ठेवले आहेत. तापमान उणे 120 ते 200 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार आहे. 20 सप्टेंबरपासून चंद्रावर सूर्योदय होईल, त्यानंतर 22 सप्टेंबरपर्यंत सौर पॅनल आणि इतर उपकरणं पूर्णपणानं चार्ज होतील. म्हणून आम्ही लँडर आणि रोव्हर दोन्ही सक्रिय करण्याचा प्रयत्न करू', अशी माहिती नीलेश देसाई यांनी दिली आहे.
चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसाच्या बरोबरीचा :चंद्रावर सूर्योदय झाल्यानंतर लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' पुन्हा सक्रिय करण्यात येईल. त्यानंतर आम्हाला पुन्हा चंद्रावर प्रयोग करुन डाटा गोळा करता येईल. आम्ही 22 सप्टेंबरनंतर लँडर आणि रोव्हर सक्रिय करण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत आहोत, अशी माहिती नीलेश देसाई यांनी दिली. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसाच्या बरोबरीचा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- chandrayaan-3 : चंद्रयान 3 ची मोहीम सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद -बाळासाहेब थोरात यांचे गौरवोद्गार
- Kangana Ranaut on ISRO : 'इस्रो'मधील महिला शास्त्रज्ञांचं कंगना रणौतनं केलं कौतुक...