बंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) महत्त्वकांक्षी चंद्रमोहीमेविषयी महत्त्वाची बातमी आहे. चंद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून इस्रोला पहिला संदेश देखील पाठवला आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत असल्याचा संदेश चंद्रयान-3 ने पाठवला आहे. MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling lunar gravity, असा संदेश इस्रोला मिळाला आहे. याविषयीची इस्रोने ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान इस्रोने चंद्रयान-3 अंतराळयान 14 जुलै रोजी प्रक्षेपित केले होते. या उपग्रहाने चंद्राच्या दोन-तृतीयांश अंतर पूर्ण केले आहे.
या दिवशी उतरेल चंद्रावर: 1 ऑगस्ट रोजी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने नेण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. आता या उपग्रहाला 'ट्रान्सलुनर ऑर्बिट'मध्ये ठेवण्यात आले आहे. इस्रोनुसार, उद्या हे उपग्रह चंद्राच्या कक्षेत सोडले जाईल. इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की, शनिवारी चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत जाणार आहे. इस्रोने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-3 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल असेल असे म्हटले आहे.