नवी दिल्ली : चांद्रयान - 3 च्या प्रक्षेपणासाठी 13 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. 13 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता चांद्रयान - 3 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. चांद्रयान - 2 नंतर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरणे आणि तेथील पृष्ठभागाचे अवलोकन करणे हे चांद्रयान - 3 चे मिशन आहे.
सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपण : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान - 3 लाँच व्हेईकल मार्क-3 द्वारे आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले जाईल. त्यासाठी 13 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजताची वेळ निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रोपेलंट मॉड्यूल 'लँडर' आणि 'रोव्हर'ला चंद्राच्या कक्षेत 100 किमी पर्यंत घेऊन जाईल. यामध्ये चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या ध्रुवीय मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी 'स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री' पेलोड देखील जोडण्यात आला आहे.
तयारी अंतिम टप्यात : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, जर चाचण्या योजनेनुसार झाल्या तर चांद्रयान - 3, इस्रोच्या चंद्र मोहिमेची तिसरी आवृत्ती 12 ते 19 जुलै दरम्यान प्रक्षेपित केली जाईल. एस सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान यापूर्वीच श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील यूआर राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपण पॅडवर पोहोचले आहे. ते म्हणाले की, तयारी अंतिम टप्यात आहे जी या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल.
चांद्रयान - 3 मध्ये केल्या सुधारणा : ते म्हणाले की, आगामी प्रक्षेपणादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून चांद्रयान - 3 मध्ये हार्डवेअर, संरचना, संगणक, सॉफ्टवेअर आणि सेन्सर्समध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये अधिक इंधनासह लँडिंग पाय मजबूत करण्यात आले आहेत. याशिवाय अधिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मोठे सोलर पॅनल बसवण्यात आले असून अतिरिक्त सेन्सरही जोडण्यात आला आहे.
हेही वाचा :
- India to Sign Artemis Accords : इस्त्रो नासा 2024 मध्ये लाँच करणार संयुक्त अंतराळ मोहीम, भारत आर्टेमिस अॅकॉर्डमध्ये होणार सामील