नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी सोमवारी सांगितले की, चांद्रयान - 3 यावर्षी जुलैमध्ये प्रक्षेपित होईल. सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) येथून दुसऱ्या पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह NSV-01 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर त्यांनी हे भाष्य केले.
2019 मध्ये चांद्रयान-2 झाले होते क्रॅश : आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. लँडरमध्ये चंद्राच्या नियुक्त केलेल्या जागेवर सॉफ्ट लॅंडींग करण्याची आणि रोव्हर तैनात करण्याची क्षमता असेल, जे त्याच्या गतिशीलतेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे इन-सीटू रासायनिक विश्लेषण करेल. भारतीय चंद्र अन्वेषण कार्यक्रम ही इस्रोच्या बाह्य अवकाश मोहिमांची एक सतत चालू असलेली मालिका आहे. 2019 मध्ये चांद्रयान - 2 यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले होते आणि ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. परंतु त्याचे लँडर 6 सप्टेंबर 2019 रोजी एका सॉफ्टवेअर बिघाडामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करताना क्रॅश झाले.