नवी दिल्ली : Chandrayaan ३ Rover : चंद्राच्या पृष्ठभागावरील 'शिवशक्ती' पॉइंटवरून (विक्रम लँडरचा टचडाउन स्पॉट) १०० मीटरपेक्षा जास्त भ्रमण केल्यानंतर प्रज्ञान रोव्हरचं सुरक्षित पार्किंग करण्यात आलंय. सध्या रोव्हर स्लीप मोडमध्ये आहे. इस्रोनं 'X' वर पोस्ट करत ही माहिती दिली.
रोव्हरनं सुरक्षित पार्किंग केलं : 'रोव्हरनं त्याच्या सर्व असाइनमेंट पूर्ण केल्या. त्याला आता सुरक्षितपणे पार्क करण्यात आलंय. तो सध्या स्लीप मोडमध्ये सेट आहे. APXS आणि LIBS पेलोड्स बंद आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरद्वारे पृथ्वीवर प्रसारित केला जातो. सध्या, बॅटरी पूर्णपणे चार्ज आहे', अशी माहिती इस्रोनं दिली. 'चंद्रावर २२ सप्टेंबर २०२३ रोजी पुढील सूर्योदय होईल. तेव्हा रोव्हर पुन्हा अॅक्टीव्हेट होण्याची अपेक्षा आहे', असंही इस्रोनं सांगितलं.
मॉड्यूलनं चंद्रावर एक नैसर्गिक घटना नोंदवली : गुरुवारी इस्रोने सांगितलं की, विक्रम लँडरच्या प्रज्ञान रोव्हर मॉड्यूलनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक नैसर्गिक घटना नोंदवली. 'मॉड्यूलनं रोव्हर आणि इतर पेलोड्सच्या हालचालींची नोंद केली. ही घटना २६ ऑगस्ट २०२३ रोजी घडली. ही घटना नैसर्गिक असण्याची शक्यता आहे. याचा स्रोत तपासला जात आहे'.