नवी दिल्ली :भारताने केलेल्या चांद्रयान 2 मोहीमेत थोडक्यात अपयश आल्याने करोडो भारतीयांच्या आशेवर पाणी फेरले होते. मात्र आता पुन्हा एकदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान 3 ची तयारी करत आहे. चांद्रयान 3 मोहीमेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून स्पेसक्राफ्ट रॉकेटला जोडण्यात इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. सतीश धवन केंद्रात हे स्पेस लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-III) यशस्वीरित्या एकत्रित केले आहे.
चांद्रयान 3 मिशन अंतिम टप्प्यात :बुधवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये चांद्रयान 3 मोहीमेतील एन्कॅप्स्युलेट असेंबली LVM3 शी जोडली गेली. 12 ते 19 जुलै दरम्यान प्रक्षेपित होणारी चांद्रयान 3 मोहीम ही चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न असेल. 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेली चांद्रयान 2 मोहीम 6 सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अपयशी ठरली होती.
चांद्रयान3 LVM3 शी जोडले गेले : चांद्रयान 3 मोहीमेतील लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे, ते स्वतःहून अंतराळात जाऊ शकत नाही. कोणत्याही उपग्रहाप्रमाणे त्याला प्रक्षेपण वाहन किंवा रॉकेटशी संलग्न करणे आवश्यक आहे. रॉकेट्समध्ये शक्तिशाली प्रणाली असते. ही प्रणाली पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून उपग्रहासारख्या जड वस्तूंना अंतराळात नेण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड ऊर्जा निर्माण करते.