विजयवाडा Chandrababu Naidu News : कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यावर एका दिवसानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू बुधवारी सकाळी विजयवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या निवासस्थानाबाहेर पक्ष समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कथित कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नायडू राजमुंद्री तुरुंगातून आपल्या घरी परतले. चंद्राबाबू नायडू 53 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते. न्यायालयानं त्यांना चार महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
काय म्हणाले चंद्राबाबू नायडू : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंद्राबाबू नायडू म्हणाले की, जेव्हा मी अडचणीत होतो, तेव्हा तुम्ही सर्व रस्त्यावर येत माझ्यासाठी प्रार्थना केली होती. केवळ आंध्र प्रदेशच नाही तर तेलंगणा आणि इतर राज्यांतील लोकांकडून मला मिळालेलं प्रेम मी कधीही विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, माझ्या 45 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मी कधीही चूक केली नाही. मी कोणालाही हे करू देणार नाही, असंही ते म्हणाले. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे आभार मानत असल्याचं त्यानी म्हटलंय. चंद्राबाबू नायडू यांना गुन्हेगार सिद्ध करण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी YSRCP अपयशी ठरल्याचं टीडीपीनं म्हटलंय. पक्षानं म्हटलंय की, सत्ताधारी वायएसआरसीपीनं चंद्राबाबू नायडूंना दोषी सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, ते अयशस्वी झाले. यावरून वायएसआरसीपीला टीडीपीची भीती असल्याचं दिसून येते.