चमोली : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या महाभयंकर दुर्घटनेमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा थेट परिणाम पृथ्वीवरील अतिथंड अशा ग्लेशिअर्सवर होत असून येथील बर्फ वेगाने वितळत आहे. याचाच परिणाम म्हणजे हिमकडा कोसळण्याची ही दुर्घटना असल्याचे संशोधक सांगत आहेत.
युसॅकच्या शास्त्रज्ञांनी दिला होता इशारा
उत्तराखंड अंतराळ उपयोग केंद्रातील(युसॅक) संशोधकांनी यापूर्वीच हिमालयातील 8 ग्लेशिअर वितळत असल्याचा इशारा दिला होता. हे केवळ हिमालयातील डोंगराळ प्रदेशातील नागरिकांसाठीच नव्हे तर देशासाठी धोकादायक असल्याचा इशारा संशोधकांनी यापूर्वीच दिला होता. ग्लोबल वॉर्मिंगमुळे नंदा देवी बायोस्फेअरमध्ये असलेल्या 8 ग्लेशिअरचे क्षेत्रफळ 26 टक्क्यांनी घटल्याचे युसॅकचे संचालक डॉ. एमपीएस बिष्ट यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. हे ग्लेशिअर दरवर्षी 5 ते 30 मीटरने मागे सरकत असल्याचे त्यांनी सांगितले.