नवी दिल्ली -चलो दिल्ली आंदोलनाचा आज (शुक्रवारी) दुसरा दिवस होता. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी रस्त्तांवर आले होते. हरियाणा सरकारकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही शेतकरी दिल्लीच्या दिशेने पुढे आले. सरकारने चर्चेसाठी तीन डिसेंबरची वाट न पाहता, तातडीने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी. अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.
आंदोलकांना दिल्लीतील त्यांना बुरारी परिसरातील निरंकारी समागम मैदानावर आंदोलनास परवानगी देण्यास आली आहे, अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिली. या निर्णयाचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी स्वागत केले. यानंतर टिकरी सीमामार्गे आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश केला.
आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी दिल्लीतील नऊ क्रीडांगणे तात्पुरत्या तुरुंगात बदलण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती. मात्र, दिल्ली सरकारने ही मागणी फेटाळली. तर दिल्ली चलो आंदोलनासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांच्या एका ट्रॅक्टरला शुक्रवारी सकाळी ट्रकने धडक दिली. या अपघातात एका शेतकऱ्याच्या मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी मृतदेहाला रस्त्यावर ठेवत तिथेच आंदोलन सुरू केले. यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.