भोपाळ (मध्य प्रदेश) : देशभरातील विविध शहरांचे नाव बदलण्यात आल्यानंतर आता लाल किल्याचे देखील नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. लाल किल्ल्याचे नाव भगवा किल्ला ठेवण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने ही मागणी केली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संबंधी पत्र लिहिले आहे. या पत्रातून स्वामी चक्रपाणी यांनी लाल किल्ल्याचे नाव बदलून भगवा किल्ला करण्याची मागणी केली आहे.
लाल किल्ल्याचे नाव होते लाल कोट :अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लाल किल्ल्याचे पूर्वीचे नाव लाल कोट होते. त्यांच्या मते, हे हिंदू राजा अनंगपाल तोमर याने 1060 मध्ये बांधले होते. ते अभिमन्यूचे वंशज आणि महान हिंदू वीर पृथ्वीराज सिंह चौहान यांचे आजोबा होते. परंतु परदेशी लुटारू मुघलांनी त्यांना पकडले. महाराज चक्रपाणी यांनी पत्रात असे लिहिले आहे की, शाहजहानने 1638 मध्ये लाल किल्ला बांधला, हे पूर्णपणे चुकीचे आहे. काही भंपक इतिहासकारांनी हा भ्रामक प्रचार केला आहे. महाराजांचे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे मुघलांनी राममंदिर, श्रीकृष्णजन्मभूमी, काशी विश्वनाथ मंदिर इत्यादींवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मशिदी बांधल्या, त्याचप्रमाणे आपल्या अनेक महापुरुषांनी बांधलेल्या मंदिरांवर दरबारी इतिहासकारांनी संभ्रम निर्माण केला आहे.