नवी दिल्ली : मणिपूरमधील दोन महिलांची विविस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे गुरुवारी केंद्र सरकारने ट्विटर आणि इतर सोशल माध्यमांना नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बुधवारी मणिपूरच्या महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने हा व्हिडिओ लवकरात लवकर सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. ही घटना 4 मे रोजी घडली असून याप्रकरणी आतापर्यंत एका संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तणाव वाढला : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर मणिपूर महिलांच्या विवस्त्र धिंड काढण्याच्या व्हिडिओबाबत केंद्र ट्विटरवर कारवाई करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतातील सक्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी ट्विटरला भारतीय कायद्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. मणिपूरच्या महिलांवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तणाव आणखी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे, त्यानंतर केंद्राने ही नोटीस जारी केली आहे.
सशस्त्र समाजकंटकांनी काढली महिलांची विवस्त्र धिंड :मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात 4 मे रोजी दोन मणिपूरच्या महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आली. याप्रकरणी अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी 19 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात दिली आहे. 4 मे रोजी अज्ञात सशस्त्र समाजकंटकांनी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली. याप्रकरणी थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक के मेघचंद्र सिंह यांनी दिली. याप्रकरणाचा तपास सुरू झाला असून राज्य पोलीस सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न करत असल्याचे के मेघचंद्र सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांचे हे निवेदन भाजप नेते अमित मालवीय यांनी देखील ट्विट केले आहे.