नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा कहर जलदगतीने वाढत आहे. कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसीवीर या औषधाची मागणीही वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे औषध मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तर अनेक ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होत असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता होती. ज्यामुळे सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाची 11 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. ज्यामुळे रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी बरीच वाढली आहे. यामुळे, भारत सरकारने भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी रेमडेसीवीरच्या निर्यातीवर बंदी लादली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणीत वाढ होऊ शकते. केंद्र सरकारचे म्हणणे आहे, की कोरोनाच्या रुग्णांमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे रेमडेसीवीरची वाढती मागणी लक्षात घेता निर्यातीवर बंदी घातली गेली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती -
गेल्या 24 तासांत देशात 1,52,879 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. केंद्रीय आरोग्य संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी रुग्णांची संख्या 1,52,879 वर पोहचली आहे. तर नव्या 839 मृत्यूंनंतर मृतांची संख्या 1,69,275 वर पोहचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 11,08,087 पर्यंत वाढल्यानंतर भारत आता जगातील चौथा सर्वात मोठा कोरोना बाधित देश झाला आहे. दरम्यान 90,584 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,20,81,443 आहे. तर कोरोना रिकव्हरी दर 90.44 टक्के आहे.
कोरोना चाचणी आणि लसीकरण -
गेल्या 24 तासांत एकूण 1,20,81,443 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची संख्या 25,66,26,850 वर पोचली आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 35,19,987 लोकांना लस टोचवण्यात आली आहे. तर 10,15,95,147 लोकांना लस टोचवण्याच आली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
हेही वाचा -निकालाआधीच तामिळनाडूत काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू; जिंकल्यास पोटनिवडणूक