नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
परीक्षा असणार वैकल्पिक..
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ही परीक्षा वैकल्पिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी तसा पर्यायही उपलब्ध असणार आहे असे स्पष्ट करण्यात आले. ही परीक्षा जेव्हा योग्य परिस्थिती असेल, तेव्हा घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
यासोबतच, सीबीएसई बोर्डाला निर्धारीत वेळेमध्ये १२वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. योग्य निकषांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्क द्यावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुपारपासून सुरू होती बैठक..
सीबीएसई बोर्डांच्या परीक्षांबाबत दुपारपासून पंतप्रधान मोदींची बैठक सुरू होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, कापड उद्योग मंत्री स्मृती इराणी, पेट्रोलियम आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि सीबीएसईचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांना मात्र आज सकाळीच प्रकृती कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होती सुनावणी..
कोरोना परिस्थिती लक्षात घेता सीबीएसई आणि सीआयएससीईने आपल्या बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशा याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याबाबत सरकारने गुरुवारपर्यंतचा वेळ मागितल्यानंतर, सोमवारी ही सुनावणी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आज याबाबत निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा :भारतातील कोरोना स्ट्रेन्सना मिळाली ओळख; 'काप्पा' आणि 'डेल्टा' अशी नावं