नवी दिल्ली :दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआय कोणत्या प्रकरणात छापा टाकण्यासाठी पोहोचली आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या आधी ऑगस्ट महिन्यातही दिल्ली सरकारच्या नव्या अबकारी धोरणातील घोटाळ्याच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात सीबीआयने उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते.
मनीष सिसोदिया यांचे ट्विट : मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापे टाकले, माझ्या कार्यालयावर छापे टाकले, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावातही झडती घेतली. माझ्याविरुद्ध काहीही सापडले नाही आणि सापडणार नाही. कारण मी मी काहीही चुकीचे केले नाही. मी प्रामाणिकपणे दिल्लीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम केले आहे'.
19 ऑगस्ट रोजी देखील निवासस्थानावर छापा टाकला होता : सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्यासह 15 लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. त्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, उत्पादन शुल्क आयुक्त आरव गोपी कृष्णा, उत्पादन शुल्क उपायुक्त आनंद तिवारी आदींची नावे होती. बरोबर दोन दिवसांनी म्हणजे 19 ऑगस्टला सीबीआय छापा टाकण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर 17 ऑक्टोबर रोजी त्यांना सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्या गाझियाबाद येथील बँक खात्याचीही झडती घेण्यात आली.