नवी दिल्ली Cash For Query Allegation : लोकसभेच्या आचरण समितीची आज बैठक होणार आहे. यात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात लाच घेतल्यावर प्रश्न विचारल्या प्रकरणी अहवालाचा मसुदा स्वीकारला जाऊ शकतो. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती. मोईत्रा यांनी भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूहाला लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा त्यांनी आरोप केला होता.
समिती घेणार आरोपांची गंभीर दखल : लोकसभेच्या 15 सदस्यीय आचरण समितीमध्ये भाजपचे सात, काँग्रेसचे तीन आणि बसपा, शिवसेना, वायएसआर काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनता दल (संयुक्त) यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. ही समिती मोईत्रा यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल घेण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोईत्रा यांनी मागील बैठकीत समितीचे प्रमुख विनोदकुमार सोनकर यांच्यावर असभ्य आणि वैयक्तिक प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. विरोधी सदस्यांनी याला असहमती दर्शवण्याची शक्यता असताना, ही समिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या अहवालात तृणमूल काँग्रेसच्या खासदाराविरोधात शिफारस करू शकते. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं की त्यांचे सदस्य एन उत्तम कुमार रेड्डी आणि व्ही वैथिलिंगम असहमतीचा प्रस्ताव सादर करणार आहेत. आचरण समितीमध्ये काँग्रेस कोट्यातून पंजाबच्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांचा समावेश आहे. अमरिंदर सिंग हे यापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.