नवी दिल्ली Cash For Query Case :तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आज कॅश फॉर क्वेरी प्रकरणात लोकसभेच्या आचरण समितीसमोर हजर होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्यावर लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. यानंतर चांगलंच राजकारण तापलंय. या प्रकरणाला आता वेग आला. भाजपा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या आचरण समितीकडे पाठवण्यात आलंय.
आज लोकसभेच्या आचरण समितीसमोर होणार हजर : मंगळवारी खासदार महुआ मोईत्रा यांनी सांगितलं की, त्या गुरुवारी लोकसभेच्या आचरण समितीसमोर हजर होणार आहेत. यासोबतच त्यांनी कॅश फॉर क्वेरी प्रकरणातील आरोपांवर व्यापारी दर्शन हिरानंदानी आणि वकील जय अनंत देहद्राई यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मागितली. त्याचवेळी, महुआ यांनी नीती समितीसमोर हजर राहण्यासाठी 5 नोव्हेंबरनंतरची तारीख देण्याची विनंती केली होती. परंतु, समितीनं त्यांची विनंती फेटाळली. त्यांना 2 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितलं. महुआंनी सांगितलं की जेव्हा त्या आचरण समितीसमोर येतील, तेव्हा सर्व खोटेपणा उघड करेल. मी एक रुपयाही घेतला असता तर भाजपानं मला आतापर्यंत तुरुंगात टाकलं असतं, असंही त्या म्हणाल्या.