नवी दिल्ली- राजकारणातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा आदेश दिला आहे. यापुढे राज्य सरकारांना खासदार व आमदारांवरील गुन्हे उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय मागे घेता येणार नाहीत., असा आदेशच सर्वोच न्यायालयाने पारित केला आहे. आमदार आणि खासदार यांच्या विरोधातील गुन्ह्यांची लवकर सुनावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष खंडपीठासमोर सुनावणी करण्याचा निर्णयही न्यायालयाने घेतला आहे.
सरन्यायाधीश एन व्ही रमाना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र आणि सीबीआय सारख्या एजन्सींकडून आवश्यक स्थिती अहवाल सादर न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राजकारण्यां विरोधातील फौजदारी खटल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष खंडपीठ स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील आणि अमिकस क्युरि विजय हंसरिया आणि वकील स्नेहा कलिता यांच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
सीआरपीसीच्या कलम 321 नुसार वादी पक्षास म्हणजे राज्यांना ते खटले मागे घेण्याचे अधिकार अधिकार देते. मात्र या कलमाचा दुरउपयोग होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालने एका हा निर्णय दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की पक्षकारांना राजकारण्यांविरोधातील प्रलंबित गुन्हे उच्च न्यायालयाच्या मंजूरीशिवाय परत घेता येणार नाही. सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या राज्यांनी सीआरपीसीच्या कलम 321 चा वापर करून राजकारण्यांविरुद्ध गुन्हेगारी खटले मागे घेण्याची मागणी केली आहे