बंगळुरू : कर्नाटक पोलिसांनी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवमोग्गामध्ये झालेल्या किसान महापंचायतीवेळी भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कोट पोलिसांनी सुओ मोटो दाखल करत हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोप्पड पोलीस उपनिरीक्षकांनी तक्रार दाखल केली होती.
२० मार्चला डॉ. दर्शन पॉल आणि युधवीर सिंग यांनी कर्नाटकमध्ये किसान महापंचायतीचे आयोजन केले होते. या महापंचायतीला राकेश टिकैतही उपस्थित होते. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी दिल्लीप्रमाणे बंगळुरूमध्येही ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करा असे आवाहन केले होते. यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महापंचायतीला जनता दल (सेक्युलर), जेडीएस आणि काँग्रेस नेत्यांसह तब्बल आठ हजार लोक उपस्थित होते.